(मंडणगड/ रत्नागिरी)
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारनंतर वाऱ्यासह जोरदार पुनरागमन केले. उकाड्याने हैराण झालेल्या मंडणगड तालुकावासीयांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून, पावसाच्या आगमनाने शेतकरीवर्गही सुखावला आहे. मात्र, पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने मंडणगड शहर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानींना तडाखा दिला. वाऱ्याच्या वेगापुढे काही कमानी कोसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दापोली फाटा ते मंडणगड शहरादरम्यान उभारण्यात आलेल्या काही कमानी वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे कोसळल्या. राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या या कमानी कोसळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागले. बाजारपेठेतील काही कमानीही वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्या. मात्र, त्या कोणत्याही दुकानावर अथवा नागरिकांवर पडल्या नसल्याने मोठा अनर्थ टळला.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुकावासीयांना त्याच्या पुनरागमनाने दिलासा मिळाला असला, तरी या पावसासोबत आलेल्या वाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या संरचनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. उत्सवांच्या निमित्ताने महामार्गालगत आणि गर्दीच्या ठिकाणी कमानी उभारताना त्यांची मजबुती, सुरक्षित बांधणी आणि वाहतुकीला होणारा संभाव्य अडथळा यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.


