(राजापूर)
राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी संचालक ॲड. शशिकांत सुतार यांची, तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विवेक गादीकर यांना सलग दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया गुरुवारी दि. २९ जानेवारी रोजी बँकेच्या राजापूर शाखेतील प्रशिक्षण सभागृहात पार पडली. सहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली.
बँकेवर सत्ताधारी असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या निर्णयानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली.
अध्यक्षपदासाठी ॲड. शशिकांत सुतार यांचे नाव आधीच निश्चित करण्यात आले होते, तर उपाध्यक्षपदासाठी विवेक गादीकर यांचे नाव आजच घोषित करण्यात आले. दोन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
ॲड. शशिकांत सुतार यांनी यापूर्वी पाच वर्षे बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून काम केले असून, अलीकडील निवडणुकीत ते सहकार पॅनेलकडून संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यांना प्रथमच बँकेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. विवेक गादीकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले असून, त्यांना आता दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.
निवड जाहीर होताच निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार पाटील यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. मावळते अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनीही शुभेच्छा दिल्या. यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मंदार सप्रे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते व पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. शशिकांत सुतार यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारही कार्यक्रमाला उपस्थित होता.
प्रसंगी बोलताना सहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील यांनी राजापूर अर्बन बँकेच्या कार्याची प्रशंसा करत, भविष्यातही संचालक मंडळ व सभासदांच्या विश्वासावर बँक निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला. संचालक दिनानाथ कोळवणकर व अनिलकुमार करंगुटकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर नूतन अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
फोटो : राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. शशिकांत सुतार व उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार पाटील. सोबत मावळते अध्यक्ष संजय ओगले, विजय पाध्ये व संचालक मंडळ.

