(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्याची सध्या अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांचे स्वरूप धोकादायक बनले आहे. पाण्याखाली खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनांचे चाक अचानक खड्ड्यात आदळत असून, वाहनचालकांना दररोज दणके सहन करावे लागत आहेत.
शासकीय विश्रामगृहाच्या अगदी समोरच रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याची नेमकी स्थिती लक्षात येत नाही. खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज न आल्याने वाहनाचे चाक त्यात गेल्यानंतरच रस्त्याची दुरवस्था लक्षात येते. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच मार्गावरून पुढे गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान आहे. तसेच थिबा पॉईंट, थिबा राजवाडा अशी पर्यटनस्थळे आहे यासोबत या अंतर्गत मार्गाने मारुती मंदिर परिसरात जाण्यासाठी हा रस्ता मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यामुळे या रस्त्याला शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. मात्र महत्त्वाच्या ठिकाणी जाणारा हा रस्ता असूनही त्यावरील खड्ड्यांकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असताना त्यांची खोली दिवसेंदिवस वाढत आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याऐवजी परिस्थिती आणखी बिकट होण्याची वाट पाहिली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गाची ही अवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असून, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खड्डे वाढत आहेत की अपघाताची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

