(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड व लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा संदेश गेला आहे.
सफीउल्ला समीर सोलकर (वय २४, रा. कोकण नगर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित प्रकरणात आरोपीने ओळखीच्या अल्पवयीन मुलीला ती कामावर जात असताना मारुती मंदिर परिसरात अडवून तिच्या गळ्यात हात घालून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. तसेच “तू माझ्यावर प्रेम करतेस का नाही” अशी जबरदस्तीची विचारणा करत तिचा हात धरून गाडीवर बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने विरोध दर्शविल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने हस्तक्षेप केल्याने आरोपी तेथून निघून गेला.
घटनेनंतर पीडितेने तात्काळ आईला माहिती देत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४(अ), ३५४(ड) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात आरोपीने यापूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मध्येही पीडितेला लैंगिक त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरोधात बलात्कारासह (कलम ३७६(२)) व पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, १० अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता भोसले यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. मेघना सुहास नलावडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
सरकार पक्षाने सादर केलेला ठोस पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी आरोपीस भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ७ सह ८ अंतर्गत दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत कायद्याची कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

