(खेड)
लोटे औद्योगिक वसाहतीतील स्पॅक सरफानटाईन कंपनीत बुधवारी (२३ एप्रिल) घडलेल्या दुर्घटनेत सोनगाव येथील प्रदीप खेराडे (वय ५२) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या तपासासाठी पोलिस आणि कोल्हापूर येथील कामगार निरीक्षकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
प्रदीप खेराडे हे सकाळच्या सत्रात कंपनी आवाराबाहेर असताना अचानक बेशुद्ध पडल्याची घटना समोर आली होती. काही महिला कामगारांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना कंपनीच्या आवारात हलवले. मात्र, या गंभीर घडामोडीकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
त्यानंतर खेराडे जिन्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अधिक माहिती घेण्यासाठी कंपनीत पोहोचले, मात्र कंपनी व्यवस्थापनाने पत्रकारांना टाळण्याची भूमिका घेतली. सध्या पोलिस तपास सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी अधिकृत अहवालांची प्रतीक्षा आहे.