(राजापूर / तुषार पाचलकर)
अनुस्कुरा घाटात आज (मंगळवारी) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका अवजड चारचाकी वाहनाचा गिअर बॉक्स खराब झाल्याने हे वाहन घाटातील मार्गावरच बंद पडले. त्यामुळे गेल्या सुमारे तीन तासांपासून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या दुचाकी व छोटी वाहने सावधगिरीने सोडण्यात येत असून, अवजड वाहनांना मात्र अडथळा निर्माण झाला आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे मेजर दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाटगे, रामदास पाटील, संपत पाटील, सुशांत लवटे, रायपाटणचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण तसेच पाचलचे युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षद तेलंग, विहंग खानविलकर व अजय खानविलकर वाहनांना मार्ग करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, बंद पडलेले अवजड वाहन हटवण्यासाठी क्रेन मागविण्यात आली असून, वाहन हटवण्याचे काम सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहन पूर्णपणे हटवल्यानंतरच घाटातील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत होईल की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पाचलहून कोल्हापूर तसेच पुणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनधारकांनी खबरदारी म्हणून पाचल येथेच थांबावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या छोट्या वाहनचालकांनीही घाटातील संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत पाचल येथेच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

