(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद गुरववाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका शाहनाज भाटकर यांनी विद्यार्थ्यांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या आणि आपल्या कलागुणांना वाव दिला.
विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्जनशील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका सत्यश्री खर्डे आणि मदतनीस स्नेहा कुरतडकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्ती पावसकर यांनी सांगितले. उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

