(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता, समन्वय आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाडे यांनी १५ जून रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, एकूण ११५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि स्थगितीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गांतील १०२ पोलीस अंमलदार आणि १३ चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. यामध्ये २३ सहायक पोलीस फौजदार, २० पोलीस हवालदार, १ पोलीस नाईक, २१ पोलीस शिपाई आणि १ चालक पोलीस शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर समुपदेशन आणि प्रशासकीय कारणांमुळे ३७ पोलीस अंमलदार व १२ चालकांना एका वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष ‘पोलीस आस्थापना मंडळ’ गठित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी सदस्य म्हणून, तर प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) मुख्तार शेख सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते.
कर्मचाऱ्यांनी समुपदेशनादरम्यान दिलेल्या पसंतीक्रमाचा, सेवाकालाचा तसेच विभागीय गरजांचा सखोल विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यात प्रशासनाला यश आल्याचे मानले जात आहे. बदल्यांचे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यापक फेरबदलामुळे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि परिणामकारकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

