(दापोली)
दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठीगोडीबाव परिसरात एका ४२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. रूपेश सुरेश वाघमारे असे मृताचे नाव असून, दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेमुळे हर्णे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश वाघमारे याला मद्यपानाचे व्यसन होते. या कारणावरून त्याचे आणि त्याच्या आईमध्ये वारंवार वाद होत असत. १० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मानसिक तणावाच्या भरात त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहाटे सुमारे ३.२५ वाजता तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताची आई सुरेखा सुरेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून दापोली पोलीस ठाण्यात १० मार्च रोजी सायंकाळी ४.३९ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अमृ. क्र. २६/२०२६ तसेच बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये पुढील तपास सुरू केला आहे. मद्यपानाच्या आहारी गेलेल्या तरुणाच्या अशा दुर्दैवी निधनामुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

