( राजापूर / वार्ताहर )
कोरोना महामारी आणि त्यानंतर जगभर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे उभी राहिली असून आर्थिक विकासाचा वेग कायम आहे. भारताच्या सक्षम आर्थिक धोरणांमुळे यंदाही देशाचा आर्थिक विकासदर सहा ते सात टक्क्यांच्या आसपास राहील, असा विश्वास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ सतीश मराठे यांनी व्यक्त केला.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला नुकतीच कोकण विभाग कार्यक्षेत्राची मंजुरी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सतीश मराठे यांनी पतपेढीला सदिच्छा भेट दिली. यावेळी पतपेढीच्या प्रधान कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी मराठे यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
लहान सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था या भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करताना संस्थांनी स्वतःची स्पष्ट ध्येयधोरणे निश्चित करावीत. सर्वसामान्यांना आर्थिक सेवा देताना योग्य जोखीम व्यवस्थापनावर भर दिल्यास सहकारी संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देऊ शकतात, असे मराठे यांनी सांगितले. ग्रामीण भागात राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने केलेले काम आणि साधलेली प्रगती इतर सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतीय अर्थव्यवस्थेतील डिजिटलायझेशनचा वेग हा देखील महत्त्वाचा बदल असल्याचे सांगताना मराठे यांनी डिजिटल व्यवहार, क्यूआर कोड आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यापारी, ग्राहक तसेच बँकिंग व्यवस्थेला मोठी सुविधा मिळाल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मोठ्या संख्येने नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असून मुद्रा कर्जामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. जनधन खात्यांमुळे विविध सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचण्यास मदत झाली असून त्याचा आर्थिक व्यवहारांवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सहकारी पतसंस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. या संस्था ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचवून त्यांना आर्थिक प्रवाहात आणण्याचे काम करतात. त्यामुळे भविष्यात व्यवसायवाढीसोबतच तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर, भांडवलवाढ आणि सक्षम जोखीम व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे. एखाद्या काळात नुकसान झाले तरी त्यातून सावरून पुन्हा उभे राहण्याची क्षमता संस्थांनी निर्माण केली पाहिजे, असा सल्लाही मराठे यांनी दिला.
पतसंस्थांनी पुढील पाच वर्षांचे नियोजन करताना सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास ही सर्वात मोठी भांडवली ताकद असल्याचे लक्षात ठेवावे. विश्वासार्हतेला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल संस्थांनी उचलू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. पतसंस्थांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रारंभी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी संस्थेच्या गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. कोकण विभाग कार्यक्षेत्राची मंजुरी मिळाल्याची माहिती देताना आगामी काळात नवीन शाखा सुरू करण्यासोबतच पतपेढीची गुणात्मक वाढ साधण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी संस्थांसाठी काही नियम व अटी जाचक ठरत असल्याचे नमूद करत या प्रश्नांवर सहकार भारतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी सतीश मराठे यांच्याकडे सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी करून दिले. यावेळी सहकार भारतीचे कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, लांजाचे दादा विचारे, मत्स्य प्रकोष्ठाचे शैलेश दरगुडे, सहकार भारतीचे विनोद म्हात्रे, समीर जानवलकर, पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, सी.ए. निलेश पाटणकर, संचालक मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या वतीने सतीश मराठे यांचा सत्कार करताना अध्यक्ष प्रकाश मांडवकर. यावेळी प्रकाश लोळगे, धनंजय यादव, दादा विचारे, समीर जानवलकर, जितेंद्र पाटकर आदी.

