(ठाणे / वृत्तसंस्था)
भिवंडीत नागरिकांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या तरुणांना जाब विचारणे एका 65 वर्षीय रिक्षाचालकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जमीर मोहम्मद कासीम मोमीन (65) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. भिवंडीतील जुना ठाणे रोड परिसरातील समदनगर येथे ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीर मोमीन हे जुना ठाणे रोडवरील समदनगर परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही तरुण ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अश्लील शेरेबाजी आणि टोमणे मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तरुणांना जाब विचारला. यावेळी मोहम्मद अली सलीम अहमद मोमीन (19), हमजा उस्मान मोमीन (20) आणि नबीग इम्रान मोमीन (30) यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली.
वाद वाढल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. मोहम्मद अली मोमीन, त्याचे वडील सलीम अहमद नजीर अहमद मोमीन, हमजा मोमीन, नबीग मोमीन आणि इतरांनी जमीर मोमीन यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी सलीम मोमीन आणि मोहम्मद अली मोमीन या पिता-पुत्रांना अटक केली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील हमजा उस्मान मोमीन आणि नबीग इम्रान मोमीन हे दोघे फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
नागरिकांवर शेरेबाजी करण्यास विरोध केल्याच्या कारणातून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळून 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याने भिवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

