(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यातील विविध गावांमधील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये ही भरती प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदासाठीची ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ तसेच शासनाच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटीस प्रसिद्धी व आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर २ ते ४ सप्टेंबर दरम्यान आरक्षणासंदर्भातील आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी आणि प्रवेशपत्र वितरणाची प्रक्रिया २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होईल. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा, ५ ऑक्टोबरला निकाल, तर ६ ऑक्टोबर रोजी मुलाखत आणि अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
पोलीस पाटील हे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणारे आणि प्रशासनाशी नागरिकांचा संपर्क राखणारे महत्त्वाचे पद मानले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात नेतृत्वाची क्षमता असलेल्या युवकांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये ही प्रक्रिया एकाचवेळी राबविण्याचा निर्णय घेतल्याने भरती प्रक्रियेत एकसमानता आणि पारदर्शकता राखली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील अटी व पात्रता निकष काळजीपूर्वक तपासून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरून ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, आता या भरती प्रक्रियेकडे जिल्हाभरातील युवकांचे लक्ष लागले आहे.

