(पोलादपूर / शैलेश पालकर)
म्हाप्रळ-भोर-पंढरपूर मार्गावरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर शुक्रवारी रात्री स्विफ्ट कार आणि सुझुकी बर्गमन स्कूटरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील पत्रकार आमीर शौकत तारलेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या स्कूटरवर मागे बसलेले भाऊ शब्बीर तारलेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पोलादपूर-महाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आमीर तारलेकर आणि त्यांचे भाऊ शब्बीर तारलेकर हे सुझुकी बर्गमन स्कूटर (एमएच ०६ सीई २३३५) वरून सवाद येथील आपल्या घराकडे परतत होते. महाड तालुक्यातील भोराव फाट्याजवळ एका अपूर्ण पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरून त्यांची स्कूटर जात असताना भोरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच २४ बीआर ८३७२) त्यांच्या स्कूटरला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, आमीर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झाला. स्कूटरवर मागे बसलेले त्यांचे भाऊ शब्बीर तारलेकर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी शब्बीर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्विफ्ट कार चालक गणेश धन्यकुमार देवकाते (रा. सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
अपूर्ण रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे अपघातांचा धोका
महाड आणि पोलादपूर तालुक्यांच्या सीमेवरून जाणाऱ्या म्हाप्रळ-भोर-पंढरपूर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून रस्ता तसेच पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. अपूर्ण बांधकामे, अरुंद पर्यायी मार्ग आणि वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीमुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
याच पार्श्वभूमीवर या मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून पर्यायी मार्ग अधिक सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात आमीर तारलेकर यांचा ठसा
आमीर शौकत तारलेकर हे सवाद येथील रहिवासी असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दैनिक ‘सागर’मधून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ पत्रकारितेपासून अलिप्त राहिल्यानंतर त्यांनी ‘कोकण तक’ या यूट्यूब न्यूज चॅनेल आणि ‘महानगरी टाइम्स’च्या माध्यमातून पुन्हा पत्रकारितेला सुरुवात केली.
अलीकडेच त्यांनी ‘साप्ताहिक कोकणतक वादळवारा’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. या माध्यमाचे संपादक म्हणून ते कार्यरत होते. स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि परिसरातील घडामोडींना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून सातत्याने वाचा फोडली.
आमीर तारलेकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच पत्रकारिता क्षेत्रासह महाड, पोलादपूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. सवाद येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कोकणातील पत्रकार, विविध खात्यांचे अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध समाजबांधव तसेच सप्तक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले.

