(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वळके गावातील ज्येष्ठ माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते सखाराम लक्ष्मण सावंत (वय ९५) यांचे मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
सखाराम सावंत यांनी आपल्या युवावस्थेत महार रेजिमेंटमध्ये देशसेवा बजावली. सैनिकी जीवनानंतर त्यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. बौद्ध विकास सेवा मंडळ वळकेचे ते ज्येष्ठ सदस्य होते आणि गावातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग ठेवत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारे होते. त्यांच्या जाण्याने गावाने एक खंबीर आधारवड गमावला आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यानुमोदन कार्यक्रम बुधवार, दिनांक ४ जून २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी, फलटणवाले निवास, वळके येथे आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक विधी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयु. अनंत सखाराम सावंत, दीपक सखाराम सावंत आणि आयु. नितीन सखाराम सावंत यांच्या सौजन्याने व मंडळाच्या सहकार्याने पार पडणार आहे. सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.