(सिंधुदूर्ग / प्रतिनिधी)
सावंतवाडी शहरातील मोती तलावात कारिवडे येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकानेही तलावात उडी घेतली. मात्र, पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारिवडे येथील लिसा गोसावी ही विद्यार्थिनी तेथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळची शाळा आटोपल्यानंतर ती आपल्या चुलत बहिणीसोबत सावंतवाडीत आली होती. याचदरम्यान मुंबईहून तिला भेटण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील तिचा नातेवाईक रोहन गोसावी हा सावंतवाडीत आला होता.
तिघेही मोती तलाव परिसरातील बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याजवळ थांबले होते. यावेळी लिसा ही तलावाच्या दिशेने तोंड करून कठड्यावर बसली होती. काही क्षणांतच तिने अचानक तलावात उडी घेतली. हा प्रकार पाहून तिच्या चुलत बहिणीने तत्काळ रोहन गोसावी याला याची माहिती दिली. लिसाला वाचवण्याच्या प्रयत्नात रोहनने कोणताही विलंब न करता तलावात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने तोही पाण्यात बुडाला.
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रोहन पाण्यात तरंगताना दिसून आल्याने नागरिकांनी त्याला बाहेर काढले. मात्र, पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दुसरीकडे लिसा पाण्याखाली गेल्याने तिचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोनच्या सहाय्याने तलाव परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आणि तो पाण्याबाहेर काढण्यात आला.
दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान, लिसा हिने तलावात उडी घेण्याचा टोकाचा निर्णय नेमका कोणत्या कारणातून घेतला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस हर्षद हिंगे आणि अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मोती तलाव परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

