(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरवळ-आगवेअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी तरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शिवाजी कुवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेल्या सभेचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या सभेत सर्वानुमते नंदकुमार कुवार यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नंदकुमार कुवार हे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. ते करबुडे विभागाचे शिवसेना (शिंदे गट) युवासेना विभागप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक सलोखा आणि गावातील शांतता कायम राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना नंदकुमार कुवार यांनी गावातील सामाजिक सलोखा कायम राखण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. गावातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, तसेच अध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीला योग्य न्याय देताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
गावातील छोटे-मोठे वाद सामोपचाराने सोडविणे, नागरिकांमध्ये परस्पर समन्वय आणि बंधुभाव वाढविणे तसेच गावातील शांततामय वातावरण टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर नंदकुमार कुवार यांच्या निवडीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
नंदकुमार शिवाजी कुवार यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

