(संगमेश्वर /प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संघटनात्मक बांधणीला बळ देत शृंगारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांची संगमेश्वर, माखजन व कडवई जिल्हा परिषद गटासाठी उपतालुकाप्रमुखपदी नेमणूक केली आहे. पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
या निवडीबद्दल माजी खासदार विनायक राऊत यांनी पवार यांचे अभिनंदन करत पक्षवाढीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तळागाळातील कार्यकर्त्याला जबाबदारी देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचा हा भाग असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रसंगी माजी मंत्री रविंद्र माने, संपर्कप्रमुख सुरेश कदम, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, तालुकाप्रमुख नंदादीप उर्फ बंड्या बोरुकर, उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, तिवरेचे माजी सरपंच गोट्या सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद पवार यांनी सरपंचपदाच्या काळात गावातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वेळप्रसंगी आंदोलन व उपोषणाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची भूमिका परिचित आहे. तसेच गावातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धन व विकासावरही त्यांनी विशेष भर दिला आहे. सामान्य कार्यकर्त्याला उपतालुकाप्रमुखपदाची संधी मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

