(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
‘तुमच्या मोबाइल क्रमांकाविरोधात दहशतवादाशी संबंधित तक्रारी आहेत… तुम्हाला अटक होऊ शकते!’ अशा धमकीवजा फोनने रत्नागिरी शहरातील एका ६५ वर्षीय महिलेची अक्षरशः घाबरगुंडी उडवली. अटक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीची भीती दाखवत सायबर भामट्यांनी या महिलेला तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांना गंडा घातला. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिवनेरी, तेलीआळी येथे हा प्रकार घडला. मधश्री विलास पनसकर (वय ६५) यांना अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून संपर्क साधला. त्यांनी आपली नावे ‘निरज कुमार’ आणि ‘प्रदीप जयस्वाल’ अशी सांगितली. एवढेच नव्हे, तर आपण ‘मिनिस्ट्री ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे भासवत या भामट्यांनी सरकारी यंत्रणेचे नाव पुढे करून महिलेवर दबाव निर्माण केला. ‘तुमच्या आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकाविरुद्ध दहशतवादाशी संबंधित अनेक तक्रारी दाखल आहेत,’ असे सांगून आरोपींनी महिलेच्या मनात अटकेची भीती निर्माण केली. पुढे या कथित प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल, तर आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, असा बनाव रचण्यात आला.
इतकेच नव्हे, तर पनसकर आणि त्यांच्या पतीच्या नावावर असलेल्या ठेवींची मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येणार असून, ‘तपासणी झाल्यानंतर पैसे पुन्हा परत केले जातील,’ असा खोटा विश्वासही या भामट्यांनी दिला. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव, गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख आणि अटकेची भीती—या सगळ्या जाळ्यात पनसकर अडकल्या. यानंतर वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्याकडून ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये उकळण्यात आले. आर्थिक व्यवहार झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.१७ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.
सरकारी यंत्रणेचे नाव घेतले की घाबरू नका!
दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, पोलिस कारवाई, अटक अशा गंभीर शब्दांचा भडिमार करून नागरिकांना मानसिकदृष्ट्या घाबरवायचे आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातील पैसा हडपायचा, अशी सायबर भामट्यांची नवी क्लृप्ती समोर येत आहे. ‘फोनवर सांगितले म्हणून चौकशी, अटक किंवा पैसे ट्रान्सफर’ असा कोणताही प्रकार करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की, सायबर भामट्यांकडे बंदूक नसते; मात्र भीती निर्माण करणारा एक फोन आणि सरकारी यंत्रणेचे नाव एवढेच पुरेसे ठरते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने कितीही गंभीर आरोप केले, तरी घाबरून आर्थिक व्यवहार करण्याऐवजी अधिकृत यंत्रणेशी थेट संपर्क साधणे हाच सुरक्षित मार्ग आहे. एका फोन कॉलने निर्माण केलेली भीती अखेर ८७ लाखांच्या आर्थिक फटक्यात बदलली. आता या भामट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना कितपत यश येते, याकडे लक्ष लागले आहे.

