(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर धरण परिसरात आज (गुरुवारी) सायंकाळी भीषण अपघात झाला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास नातुनगर स्टॉपजवळ घडला. एमएच ०८ झेड ३६९२ क्रमांकाच्या झायलो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
या अपघातात सबिया मारुख जसनाईक (वय ३३, रा. भोस्ते मोहल्ला) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक (वय ४५), अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या दुर्घटनेमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

