( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
आषाढी एकादशीचे औचित्य साधून संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सुवरेवाडी येथील शाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांप्रदायिकता आणि विठ्ठलप्रेमाची बीजं रोवण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम राबवला.
पंढरपूरच्या विठुरायासाठी लाखो वारकरी पायी वारी करत एकादशीला पंढरपुरात दाखल होतात, याच परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. मुलांनी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेत सजून, “हरिनामाचा गजर” करत दिंडी काढली. शाळा परिसर आणि वाडीमध्ये अभंगाचे स्वर घुमत होते. “विठू माऊलीच्या” जयघोषात मुलांनी आनंदोत्सव साजरा केला.
या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक आबासाहेब लवटे यांनी केले. अंगणवाडी सेविका विचारे, मदतनीस सुवरे, स्वयंपाकी रंजना सुवरे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक यांचे विशेष सहकार्य लाभले. मुलांचे चेहरे भक्तीमय वातावरणात आनंदाने फुलून आले होते. एकात्मता, सहकार्य आणि पारंपरिक मूल्यांची सजीव अनुभूती देणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला.