(देवळे / प्रकाश चाळके)
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प संगमेश्वर (देवरुख) अंतर्गत वांद्री बीटच्या वतीने ओझरखोल अंगणवाडीत पोषण पखवडा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून बालकांचे पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बालविकास प्रकल्प अधिकारी प्रथमेश इंगवले, जिल्हा परिषद सदस्या सौ. माधवी गिते आणि वांद्री बीटच्या सुपरवायझर सौ. कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
मार्गदर्शन करताना इंगवले यांनी ० ते ६ वर्षे हा बालकांच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. तसेच पहिल्या १००० दिवसांमध्ये मुलांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होत असल्याने योग्य पोषण आणि काळजी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ९ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या पोषण पखवड्याद्वारे किशोरी मुली, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद सदस्या सौ. माधवी गिते यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत वांद्री बीटमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच सुपरवायझर सौ. कांबळे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव केला.
खेळजत्रा उपक्रमांतर्गत ३ ते ६ वर्षे वयोगटातील तसेच ३ वर्षांखालील मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास कसा होतो, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. स्क्रीन टाइम कमी करून मुलांसोबत प्रत्यक्ष वेळ घालवण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध वस्तूंपासून पौष्टिक पाककृती सादर करून त्यांच्या फायद्यांची माहिती दिली. समिक्षा सचिन सावंत यांनी ‘पहिले १००० दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर जिया सुतार आणि प्राजक्ता देवलाटकर यांनी मेंदू विकासाचे प्रयोगातून सादरीकरण केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. वांद्री बीटच्या सुपरवायझर सौ. कांबळे यांना ‘आदर्श सुपरवायझर’ पुरस्कार, सौ. शिल्पा केळकर यांना ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ तर सौ. प्राची नागवेकर यांना ‘आदर्श मदतनीस’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कॅन्सरसारख्या आजारावर मात केलेल्या महिलांचाही गौरव करण्यात आला.
तसेच नासा-इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या कु. आरोही दिनेश सावंत आणि पोलीस दलात निवड झालेल्या आकांक्षा नथुराम जठ्यार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, पालकवर्ग, किशोरी मुली तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पातेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बीटप्रमुख सौ. उर्मिला सावंत यांनी केले.

