(चिपळूण / दीपक कारकर)
बदलती जीवनशैली, अनियमित आहार, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहासह विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक आजारांचे वेळीच निदान होत नाही. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. याच सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब सावर्डे आयडियलच्या वतीने चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. अजित गावकर यांच्या श्री गणेश क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ११० नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये ५० जुने मधुमेही रुग्ण होते, तर १५ नागरिकांमध्ये नव्याने मधुमेहाचे निदान झाले. सहभागी नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि आवश्यक औषधोपचाराचा लाभ देण्यात आला.
शिबिरासाठी डॉ. मृणाल भुवड (MD, DNB) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. लायन अजित गावकर आणि डॉ. लायन स्वाती गावकर यांची विशेष उपस्थिती होती. नागरिकांना मधुमेह नियंत्रणासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल लायन्स क्लब सावर्डे आयडियलच्या वतीने डॉ. मृणाल भुवड यांचा भेटवस्तू आणि वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्यसेवेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गणेश क्लिनिकचे डॉक्टर, स्टाफ, कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे लायन्स क्लब सावर्डे आयडियलच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
यावेळी डॉ. अजित गावकर म्हणाले, “सेवा हीच खरी मानवता, आरोग्य हीच खरी संपत्ती आणि समाजासाठी केलेले प्रामाणिक कार्य हीच लायन्सची खरी ओळख आहे.” वाढत्या आरोग्यखर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

