(मुंबई / वृत्तसंस्था)
घाटकोपरमधील पंतनगर परिसरात सुनेचा दारूच्या नशेत बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा सासूचा प्रयत्न पोलिस तपासात उघडकीस आला आहे. पूर्वीच्या मोलकरणीला आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची सुपारी देऊन सुनेची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मयत महिलेच्या डोक्यात काचेचा ग्लास मारून, डोळ्यांत मिरची पावडर टाकून आणि ओढणीने गळा आवळल्यानंतरही तिचा मृत्यू न झाल्याने आरोपींनी तिच्या मानेवर पाय ठेवून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी सासूसह पाच जणांना अटक केली असून, हत्येच्या कटाचा उलगडा झाला आहे.
मयत महिलेचे नाव सपना प्रमोद गंजी (35) असून ती घाटकोपरमधील लक्ष्मीनगर परिसरातील त्रिवेणी बिल्डिंगमध्ये राहत होती. ती जून 2026 मध्ये मुलासह दुबईहून मुंबईत परतली होती. 16 ऑगस्ट रोजी रात्री सपना बाथरूममध्ये घसरून पडल्याचे सांगत तिची सासू धनलक्ष्मी भिक्षापती गंजी (60) हिने तिला प्रथम घाटकोपरमधील सुप्रीम हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री 12.49 वाजता तिला मृत घोषित केले.
17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजावाडी रुग्णालयातून पंतनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता सपनाच्या गळ्याभोवती काळेनिळे व्रण दिसून आले, तर डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्राव झाल्याचे आढळले. त्यामुळे बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याच्या कथनाबाबत पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी सासू धनलक्ष्मी गंजीची चौकशी केली असता सुरुवातीला घरात झालेल्या भांडणातून आपण सुनेला धक्का दिला आणि ती बाथरूममध्ये पडून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. मात्र, तपासात पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. धनलक्ष्मी हिनेच सपनाचे डोके कठीण वस्तूवर आपटून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर मृत महिलेचे वडील राजेंद्र नरसय्या वल्लाल (63) यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 862/2026 दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 119(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
धनलक्ष्मीला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीतील चौकशीत या हत्येमागील कटाचा धक्कादायक खुलासा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, धनलक्ष्मीच्या मनात सुनेविषयी पूर्वीपासूनच राग होता. सपनाने 2024 मध्ये सासरच्या मंडळींविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ), 377 आणि 34 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. तसेच घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गतही तक्रार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच कारणातून धनलक्ष्मीने सपनाचा काटा काढण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी धनलक्ष्मीने तिची पूर्वीची मोलकरीण मंगलाबाई सुरेश जाधव (45) आणि तिचा पती सुरेश गणपत जाधव (46), मुलगी शिवानी सुरेश जाधव (21) आणि मुलगा साजन सुरेश जाधव (19) यांच्यासोबत मिळून सपनाच्या हत्येचा कट रचला. या हत्येसाठी मोलकरीण आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्याचे ठरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
16 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 4.45 वाजता सपना घरात एकटी असताना आरोपी एकामागून एक घरात दाखल झाले. त्यावेळी सपना दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी तिच्या डोक्यावर काचेचा ग्लास मारला आणि तिच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर ओढणीच्या मदतीने तिचा गळा आवळण्यात आला. तरीही तिचा मृत्यू न झाल्याने आरोपी क्रमांक 4 आणि 5 यांनी तिच्या मानेवर पाय ठेवून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हत्येनंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची चौकशी यांच्या आधारे पोलिसांनी हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आणला. या प्रकरणात धनलक्ष्मी गंजीसह मंगला जाधव, शिवानी जाधव, सुरेश जाधव आणि साजन जाधव या पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी क्रमांक 2 ते 5 यांना 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, सुरुवातीला बाथरूममध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, मृतदेहावरील जखमा आणि गळ्यावरील खुणांमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यानंतर तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व चौकशीतून तीन लाखांच्या सुपारीचा आणि पाच आरोपींच्या कटाचा उलगडा झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पंतनगर पोलिस करत आहेत.

