( रत्नागिरी / वार्ताहर )
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कशेळी क्रमांक १ ची विद्यार्थिनी कु. आराध्या जयवंत परपते हिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेसह ग्रामपंचायत आणि श्री. सोंबा-जुगाई देवस्थानाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शाळेत आयोजित कार्यक्रमात आराध्या परपते हिचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत आणि श्री सोंबा-जुगाई देवस्थानाच्या वतीनेही तिचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणप्रेमी श्री. शांताराम सोना परपते यांनी आराध्याला वैयक्तिक बक्षीस देऊन तिचे कौतुक केले.
आराध्याच्या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. वर्गशिक्षक लवेश गोरे, तत्कालीन मुख्याध्यापक शिवराम किनरे, निलेश काळे आणि मुख्याध्यापक प्रदीप करंबेळकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल पर्वते, उपाध्यक्ष सौ. अवनी परपते, श्री. सोंबा-जुगाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश बावकर व सर्व सदस्य, गावप्रमुख श्री. शांताराम परपते, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी श्री. शांताराम सोना परपते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
आराध्याच्या या यशामुळे कशेळी गावासह शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, तिच्या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

