(नाणीजधाम / वार्ताहर)
जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी जन्मोत्सव दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नाणीजधाम येथे दाखल होऊ लागले असून, सुंदरगडावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, देवदेवतांना निमंत्रण देणाऱ्या मिरवणुका, सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग, प्रवचन आणि अभिष्टचिंतन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये एका कार्डियाक रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सलग चौथ्या वर्षी वसुंधरा पायी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, तेलंगणा, परभणी, नाशिक, पुणे, मुंबई आणि गोवा अशा सात ठिकाणांहून या दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने या दिंड्या नाणीजधाम येथे दाखल होत आहेत.


