(राजापूर / तुषार पाचलकर)
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस हातिवले टोलनाका सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक तसेच वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करून टोल बंद पाडू, असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. त्यामुळे टोलनाका सुरू होण्यापूर्वीच टोलमाफीच्या मागणीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. स्थानिक वाहनचालकांना टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर हातिवले येथील टोलनाका अद्याप कार्यान्वित झालेला नाही. तसेच स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका सुरू झाल्याने हातिवले टोलनाकाही लवकरच सुरू होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता असल्याने स्थानिक वाहनचालकांमध्ये टोलमाफीच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.
राजापूर शहर हे तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय, व्यावसायिक आणि दैनंदिन कामांचे प्रमुख केंद्र आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार राजापूर शहरात ये-जा करावी लागते. काही वाहनचालकांना दिवसातून चार-पाच वेळाही या मार्गावरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रत्येक फेरीसाठी टोल भरावा लागल्यास स्थानिक वाहनचालकांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे लांजेकर यांनी सांगितले.
स्थानिक नागरिक आणि वाहतूकदारांना हातिवले टोलनाक्यावर संपूर्ण टोलमाफी मिळावी, यासाठी यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप या मागणीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांच्या टोलमाफीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. हातिवले टोलनाका कार्यान्वित झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच वाहतूकदारांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात ये-जा होणार आहे. त्यामुळे स्थानिक वाहनांना टोलमाफी देणे आवश्यक असल्याची भूमिका श्री. लांजेकर यांनी मांडली.
“राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक आणि वाहतूकदारांना हातिवले टोलनाक्यावर संपूर्ण टोलमाफी मिळाली पाहिजे. वारंवार प्रवास करणाऱ्या स्थानिक वाहनचालकांना प्रत्येक वेळी टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. टोलमाफीबाबत तातडीने निर्णय घेतला नाही, तर स्थानिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास टोल बंद पाडण्यात येईल,” असा इशारा अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.
हातिवले टोलनाका सुरू होण्यापूर्वीच स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याबाबत शासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग कोणता निर्णय घेतो, याकडे आता राजापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

