(जैतापूर / राजन लाड)
मालवणी रंगभूमीला समृद्ध करणारे आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राच्या रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शोकसभा शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता मुंबईत पार पडणार आहे.
ही शोकसभा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंत नाट्य मंदिर – साळगावकर प्रायोगिक रंगमंच, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मुंबई – ४०००१६ येथे होणार आहे. या सभेचे आयोजन माडबन गाव व पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गंगाराम गवाणकर हे कोकणातील नाट्यसृष्टीतील एक मान्यवर, लोकप्रिय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. ‘वस्त्रहरण’, ‘सुनबाई तोऱ्यात’, ‘वन रूम किचन’, ‘वात्रट मेले वडाची साल पिंपळाक’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी मालवणी भाषेला आणि कोकणातील संस्कृतीला प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले.
पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून कोकणातील जीवन, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचे जिवंत दर्शन घडले.
गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोकणच्या रंगभूमीवर आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली.
या शोकसभेला नाट्य, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती, सहकारी कलाकार आणि चाहत्यांचा सहभाग अपेक्षित आहे. कोकणच्या नाट्यपरंपरेला नवे आयाम देणाऱ्या या महान कलावंताला सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. शैलेश द. वाघधरे – 8369872150
ऍड. दत्तराज द. शिरवडकर – 9820068263
श्री. भरत कणेरी – 9892442365
श्री. आबाजी गवाणकर – 9892599284
श्री. उमेश काजवे – 9221286130

