(दापोली /रत्नागिरी)
श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून ठेवीदारांच्या विश्वासाला तडा दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांसह तब्बल १३ जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी श्रीमती श्रीया जीवन झगडे (४२, रा. करजगाव, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटीया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळुराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम केळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रत्नागिरीचे उपजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या १४ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशानुसार श्रीया झगडे यांनी श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणादरम्यान संस्थेच्या कामकाजातील अनेक गंभीर बाबी समोर आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकाऱ्यांनी आपसांत संगनमत करून कथित फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप आहे. कर्जासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असूनही त्याच कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर संस्थेच्या उपविधीतील नियमांना हरताळ फासून कर्जवाटप करण्यात आल्याचा आरोपही आहे.
ठेवीदारांनी विश्वासाने संस्थेकडे जमा केलेल्या पैशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेवीदारांचा विश्वास हीच पतसंस्थेची खरी भांडवलशक्ती असते; त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेतील तसेच संबंधित जुन्या कायदेशीर तरतुदींनुसार कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४६ आणि १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे, नियमबाह्य कर्जवाटप आणि संगनमताच्या आरोपांमुळे दापोलीतील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासाकडे ठेवीदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. पतसंस्थेच्या कारभारात नेमका किती आर्थिक गैरव्यवहार झाला, कर्जवाटपातील अनियमिततेमागे कोणाची भूमिका होती आणि ठेवीदारांच्या पैशांचे काय झाले, याचा उलगडा आता पोलिसांच्या तपासातून होणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

