(दापोली / प्रतिनिधी)
तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी आनंददायी घडामोड समोर आली आहे. या किनाऱ्यावर आढळलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची तब्बल ४६ अंडी सुरक्षितरीत्या संरक्षित करण्यात आली असून, स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा संवर्धन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
समुद्रकिनाऱ्यावर कासवांनी घातलेली अंडी नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल तसेच भटक्या प्राण्यांपासून सुरक्षित राहावीत, यासाठी ती काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी हलवून विशेष संरक्षणाखाली ठेवण्यात आली आहेत. या अंड्यांमधून येत्या काही दिवसांत कासवांची पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यानंतर ही पिल्ले पुन्हा समुद्रात सोडण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या उपक्रमामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार असून, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही वाढीस लागली आहे. स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत असल्याचे चित्र मुरुड परिसरात पाहायला मिळत आहे.
या संवर्धन मोहिमेत कासव रक्षक राजेश शिगवण आणि दुर्गेश जाधव यांचे विशेष योगदान लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुरुड किनाऱ्यावर भविष्यात ‘कासव महोत्सव’ अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्री जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल कोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

