(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित निष्काळजी कारभारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात केंद्र सायंकाळी बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केल्याच्या दिवशीच सायंकाळी सर्पदंश झालेल्या एका महिलेला केंद्र बंद असल्याने उपचारासाठी दुसऱ्या आरोग्य केंद्रात जावे लागल्याची घटना घडली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. मात्र, अधिकारी निघून गेल्यानंतर काही तासांतच केंद्राला कुलूप लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याची नोंद असतानाही रात्रीच्या वेळी ना डॉक्टर उपलब्ध होते, ना अन्य कर्मचारी, असा दावा स्थानिकांनी केला.
याच दिवशी कोंडये येथील सविता संतोष गुरव या महिलेला सर्पदंश झाला. त्यांच्या हातातून रक्तस्त्राव होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, केंद्र बंद असल्याचे दिसून आल्याने त्यांना तातडीने जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय पथक उपलब्ध असल्याने त्वरित उपचार सुरू झाले आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
फुणगूस परिसरात खासगी रुग्णालये किंवा दवाखान्यांची सुविधा अत्यल्प असल्याने ग्रामीण नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हाच उपचाराचा प्रमुख आधार आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी केंद्र बंद राहिल्यास अपघात, सर्पदंश किंवा इतर आपत्कालीन रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे रात्रीच्या सेवांवर परिणाम होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात यापूर्वीही आरोग्य प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. भविष्यात अशा प्रकारामुळे एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

