(खेड /रत्नागिरी)
खेड तालुक्यातील महाडनाका येथील सरिता अपार्टमेंटमध्ये राहणारे महेश सोनू आग्रे (वय ४७) हे घरातून बाहेर पडल्यानंतर अद्याप परत न आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा वेदांत महेश आग्रे (वय २०) याने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने वडिलांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महेश आग्रे यांनी पत्नी श्वेता यांना ‘मी बाहेर जाऊन लगेच येतो,’ असे सांगितले आणि ते घरातून बाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे अपहरणाची शक्यता व्यक्त करत मुलगा वेदांत याने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महेश आग्रे यांचा नेमका ठावठिकाणा काय, ते स्वतःहून कुठे गेले की त्यांच्या बेपत्ता होण्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.


