(खेड)
मुंबई–गोवा महामार्गावर (NH‑66) वर भरणे येथील काळकाई मंदिरासमोर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात आई व लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूकही मंदावली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून खेडच्या दिशेने येणारी कार (एमएच ०६ बीएफ ६८५४) भरणे येथील काळकाई मंदिरासमोरून जात असताना डिव्हायडर ओलांडत असलेल्या ॲक्टिव्हा स्कुटीला (एमएच ०८ एडब्ल्यू ७१२९) जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की स्कुटीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
या अपघातात अनघा अमोल पवार (वय ३७, रा. भरणे) आणि त्यांचा मुलगा आरव अमोल पवार (वय ५) हे गंभीर जखमी झाले. जखमी आई-मुलाला तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

