(संगमेश्वर)
तालुक्यातील डिंगणी ते शास्त्री पूल दरम्यान गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले असून त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर आधीच वाहतूक दाट असते. विशेषतः शास्त्री पुलावरून फुणगुस मार्गे गणपतीपुळे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
संगमेश्वर शहरात दररोजच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अनेक वाहनचालक पर्यायी म्हणून असुर्डे मार्गे संगमेश्वर बाजारपेठ गाठत आहेत. मात्र, पाईपलाइनच्या खोदकामामुळे या मार्गावरही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
या महिन्यात सुट्ट्यांचा काळ आणि पर्यटनाचा हंगाम असल्याने गणपतीपुळे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यांवरील ताण अधिक वाढला आहे. सततच्या पावसामुळे खोदकाम झालेल्या रस्त्यावर चिखल साचलेला असून, रस्ता अरुंद झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे.
दुचाकीस्वारांसाठी तर या मार्गावरून प्रवास धोक्याचा ठरत आहे. रस्त्यावर घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी काम लवकर पूर्ण करावे व सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.