(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आर्थिक स्थितीची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार, या निधीत एकूण ८,४५२ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. विशेष म्हणजे, या वर्षात देशांतर्गत देणग्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली असली, तरी मुदत ठेवींमधून मिळालेल्या व्याजामुळे फंडाचे एकूण उत्पन्न वाढले आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात पीएम केअर्स फंडाला ४७९.०६ कोटी रुपयांच्या देशांतर्गत देणग्या मिळाल्या. २०२३-२४ मध्ये ही रक्कम ६८१.८१ कोटी रुपये होती. म्हणजेच एका वर्षात देशांतर्गत देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. विदेशी देणग्यांमध्येही घट झाली असून, मागील वर्षीच्या ११.३५ लाख रुपयांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ९.२८ लाख रुपये विदेशी देणगी मिळाली.
पीएम केअर्स फंडाचे उत्पन्न ४१ टक्क्यांनी वाढले
देणग्यांमध्ये घट झाली असली तरी २०२४-२५ मध्ये पीएम केअर्स फंडाचे एकूण उत्पन्न वाढून १,२७९.९ कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही सुमारे ४१ टक्क्यांची वाढ आहे. फंडाच्या एकूण शिल्लक रकमेपैकी जवळपास ९३ टक्के रक्कम म्हणजेच ७,८४६.६५ कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यात आली आहे. या मुदत ठेवींमधून मिळालेले ४६९.३८ कोटी रुपयांचे व्याज हे २०२४-२५ मधील फंडाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत ठरले.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य आणीबाणी तसेच इतर आपत्तींच्या काळात मदतकार्याला आर्थिक सहकार्य करण्यासाठी मार्च २०२० मध्ये पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली. हा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट असून, पंतप्रधान या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. फंडाला ऐच्छिक देणग्यांमधून निधी प्राप्त होतो.
पीएम केअर्स फंडातून खर्च किती?
२०२४-२५ या आर्थिक वर्षात पीएम केअर्स फंडातून करण्यात आलेला एकूण खर्च ८७.८५ लाख रुपये होता. विशेष म्हणजे, २०२३-२४ मध्ये हा खर्च १५.६० कोटी रुपये होता. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये फंडातून झालेल्या खर्चात मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
एकीकडे फंडातील एकूण उत्पन्न वाढले असून मोठी रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवलेली आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत आणि विदेशी देणग्यांमध्ये घट झाली आहे. २०२४-२५ मधील या आकडेवारीमुळे पीएम केअर्स फंडातील शिल्लक रक्कम, उत्पन्नाचे स्रोत आणि खर्च याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

