(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी नोंदवली आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार विविध क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संस्थांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील दोन बुद्धिबळपटूंची निवड झाली आहे. ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार
उत्कृष्ट प्रशिक्षकांना दिला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार २०२५ महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना नियमित श्रेणीत जाहीर झाला आहे. खेळाडूंना सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीसाठी घडविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडचाही राष्ट्रीय सन्मान
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२५ साठी पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडची निवड झाली आहे. पॅरालिम्पिक खेळाडूंना प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देत त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संस्थेकडून केले जात आहे.
देशभरातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचाही गौरव
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत महाराष्ट्रातील पुरस्कारार्थींसोबत देशभरातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात आला आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल व्ही., प्रियंका गोस्वामी, त्रिशा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद, नरेंद्र, धनुष श्रीकांत, लालरेमसियामी, राजकुमार पाल, सुरजीत, पूजा, रुद्रांश खंडेलवाल, एकता भायन, अरविंद सिंह आणि अखिल श्योरान यांची निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार जीवनगौरव श्रेणीत फुटबॉलपटू आय. अरुमइनायागम यांचा समावेश आहे.
द्रोणाचार्य पुरस्काराच्या नियमित श्रेणीत ॲथलेटिक्समधील परवीर सिंह आणि बॉक्सिंगमधील छोटे लाल यादव यांची निवड झाली आहे. तर द्रोणाचार्य पुरस्काराच्या जीवनगौरव श्रेणीत बॉक्सिंगचे प्रशिक्षक धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्तीचे प्रशिक्षक वीरेंदर कुमार यांचा गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील या निवडीमुळे महाराष्ट्रातील बुद्धिबळ, नेमबाजी आणि पॅरालिम्पिक क्रीडा क्षेत्राला मोठी राष्ट्रीय ओळख मिळाली असून, राज्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

