(सातारा)
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माण तालुक्यातील तुपेवाडी-वरकुटे गावात धाड टाकून तब्बल ४० किलो गांजा जप्त केला असून, १० लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईत शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणारा शहाजी दाजी तुपे (रा. तुपेवाडी-वरकुटे, ता. माण) याला पोलिसांनी अटक केली आहे.
खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे यशस्वी कारवाई
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले होते. त्यानुसार, एका खबऱ्याने शहाजी तुपे यांनी आपल्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली.
शेतात छापा, गांजाची झाडे ताब्यात
खबऱ्याकडून माहिती मिळताच एलसीबीचे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने तात्काळ तुपेवाडी-वरकुटे येथे धाड टाकली. छाप्यात शेतात ४० गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त करून नमुना घेतला. तपास पथकाने तुपेवाडीत छापा टाकला असता शहाजी तुपे यांनी त्यांच्या शेतात 40 गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आले. 40.478 किलो वजनाचा 10,11,950 रुपये किंमतीचा ओला गांजाची लागवड केलेली झाडे, गांजाची हिरवट पाने फुले, बारीक काडया व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचे मिळुन आले. त्यांच्या विरोधात म्हसवड पोलीस स्टेशन गुरनं 327/2025 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8,20 (ब) (2) (क), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांचाही सहभाग होता. पोलिसांनी संयुक्त मोहिमेत ओल्या गांजासह सुकत ठेवलेली हिरवट पाने, फुले, बारीक काड्या असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित शहाजी तुपे याला अटक केली आहे. पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

