(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
वर्षअखेरीस भारतासह उत्तर गोलार्धातील अनेक देशांसमोर ‘सुपर अल नीनो’चे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागरात अत्यंत शक्तिशाली अल नीनो विकसित होण्याची शक्यता असून, तो १९५० नंतरचा सर्वात तीव्र अल नीनो ठरू शकतो, असा दावा अमेरिकेची राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासन संस्था (NOAA) यांच्या अहवालाचा हवाला देत करण्यात आला आहे.
सप्टेंबरपासून अल नीनोचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात होऊन वर्षअखेरीस त्याची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी सामान्य तापमानापेक्षा अधिक गरम होण्याच्या प्रक्रियेला ‘अल नीनो’ म्हटले जाते. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात. मात्र, हे वारे कमकुवत झाल्यास उबदार पाणी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या दिशेने सरकते. त्याचा परिणाम जागतिक वातावरणीय परिसंचरणावर होतो आणि विविध देशांमधील पाऊस, तापमान तसेच हवामानाच्या पद्धतीत बदल होऊ शकतात.
भारतासाठी मान्सूनच्या काळात काहीसा दिलासा?
दरम्यान, सुपर अल नीनोच्या संभाव्य प्रभावाच्या वेळेमुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सामान्यत: अल नीनोचा हिंद महासागर आणि भारताच्या आसपासच्या भागांवर परिणाम दिसून येण्यासाठी सुमारे ४० ते ४५ दिवसांचा विलंब होतो. त्यामुळे अल नीनोचा प्रभाव अधिक स्पष्ट होईपर्यंत भारतातील मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचलेला असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, इंडियन ओशन डायपोल (IOD) ही हवामान प्रणाली अल नीनोच्या काही प्रतिकूल परिणामांना मर्यादित करण्यास मदत करू शकते. त्यामुळे अल नीनो अत्यंत शक्तिशाली ठरला तरी भारतातील मान्सूनवर त्याचा परिणाम किती प्रमाणात होईल, हे इतर वातावरणीय घटकांवरही अवलंबून राहणार आहे.
हिवाळ्यात प्रभाव वाढण्याची शक्यता
यंदाचा अल नीनो अत्यंत शक्तिशाली होण्याची शक्यता सुमारे ७० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात अल नीनोची स्थिती अत्यंत मजबूत राहण्याची शक्यता सुमारे ९० टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अल नीनोचा प्रभाव कायम राहिल्यास भारतातील हवामानाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र, अल नीनोचा प्रभाव देशभरात एकसारखा राहीलच असे नाही. स्थानिक हवामान प्रणाली, समुद्राचे तापमान, IOD आणि इतर वातावरणीय घटकांनुसार वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे परिणाम बदलू शकतात.
महाराष्ट्रात मान्सूनचे पुन्हा ‘कमबॅक’?
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही काळाच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत मुंबईसह कोकण, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे एकीकडे वर्षअखेरीस संभाव्य सुपर अल नीनोमुळे हवामान बदलाची चिंता व्यक्त होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सूनच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात अल नीनोची तीव्रता, मान्सूनची स्थिती आणि समुद्रातील वातावरणीय बदल याकडे हवामान अभ्यासकांचे लक्ष राहणार आहे.

