(छत्रपती संभाजीनगर/हिंगोली)
ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाला सुरुवात केली आहे. १५ ऑगस्टपासून हिंगोली जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, या मोहिमेदरम्यान लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या. मुख्याध्यापक मद्यप्राशन करून शाळेत येत असल्याची पालकांची तक्रार करण्यात आल्यानंतर सीजेपीने प्रशासनाकडे याबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने अभिजीत दिपके यांनी मंगळवारी गावकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शाळेसाठी दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सीजेपीने दिली.
नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनानंतर ग्रामीण भागातील सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करण्यात आल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले. १५ ऑगस्टपासून हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांची पाहणी सुरू करण्यात आली. या पाहणीदरम्यान अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आल्याचा दावा पक्षाने केला आहे.
लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांविरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी तक्रार केली होती. मुख्याध्यापक मद्यप्राशन करून शाळेत येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीची माहिती अभिजीत दिपके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. तसेच कारवाई न झाल्यास मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनापूर्वीच संबंधित मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सीजेपीला देण्यात आली, असे पक्षाकडून सांगण्यात आले.
मात्र, शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने अभिजीत दिपके यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर शाळेसाठी दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्यात आल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून शाळांमधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिपके यांनी सांगितले.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील संतुकपिंपरी गावातून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या पाहणीला सुरुवात करण्यात आली होती. तेथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि खिडक्या मोडलेल्या असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले. शाळेची अवस्था सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने प्रयत्न करण्याचे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले होते. त्यानंतर गावच्या सरपंचांनी शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून, मोडलेल्या खिडक्यांची दुरुस्ती आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
‘स्कूल ठीक करो’ अभियान केवळ एका शाळेपुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा सीजेपीचा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, इमारतीची दुरुस्ती आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत सुविधांवर या अभियानात भर दिला जात आहे.
‘जनसंवाद दौऱ्या’तून जनतेच्या समस्या जाणून घेणार
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी यापूर्वी पक्षाच्या ‘जनसंवाद दौऱ्या’ची माहिती दिली होती. जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी देशभरात हा दौरा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. स्वातंत्र्यदिनापासून शिक्षणाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येत असून, ‘स्कूल ठीक करो’ अभियान हा त्याच मोहिमेचा पुढील टप्पा असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.
सरकारी शाळांमधील समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अभियानाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ही मोहीम इतर भागांतही राबवण्याचा पक्षाचा दावा आहे.

