(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळेपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणसे गावातील हटवाडी सोमनदीवरील ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. निसर्गरम्य परिसर, नदीतील अर्धवर्तुळाकार बंधारे, त्यातून कोसळणारे फेसाळणारे पाणी आणि आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यातच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धामणसे ग्रामपंचायतीने नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याचे मनमोहक प्रतिरूप साकारल्याने या पर्यटनस्थळाच्या आकर्षणात आणखी भर पडली आहे.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धामणसे ग्रामपंचायतीने पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर विशेष विद्युत रोषणाई केली. पुलावरून विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्यातील भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचे प्रतिबिंब नदीतील पाण्यावर पडेल, अशा पद्धतीने ही आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात पाण्यावर उमटणारे तिरंग्याचे हे प्रतिबिंब पाहताना पर्यटक अक्षरशः भारावून जात होते. या नयनरम्य दृश्याने स्थानिक नागरिकांमध्येही विशेष उत्साह निर्माण झाला होता.
तिरंग्याचे हे आकर्षक प्रतिरूप सलग तीन दिवस पर्यटकांना पाहता यावे, यासाठी 14 ते 17 ऑगस्टदरम्यान ही विद्युत रोषणाई खुली ठेवण्यात आली होती. या तीन दिवसांच्या कालावधीत सायंकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर पडणाऱ्या प्रकाशामुळे पाण्यावर तयार होणारे तिरंग्याचे मनोहारी प्रतिबिंब पर्यटकांना पाहता आले. या वेगळ्या आणि आकर्षक उपक्रमामुळे हटवाडीच्या पर्यटनस्थळाला स्वातंत्र्यदिनाच्या काळात विशेष प्रसिद्धी मिळाली.
दरम्यान, यावेळी नदीमध्ये पोहण्यासाठी पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला होता, अशी माहिती धामणसे ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. मात्र, पोहता येत नसले तरी या ठिकाणच्या निसर्गसौंदर्याचा आणि तिरंग्याच्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. अनेक पर्यटकांनी आपल्या मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांमध्ये या सुंदर दृश्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपण्याची संधी साधली.
धामणसे हटवाडी येथे ओरीतून धामणसेकडे येणाऱ्या मोठ्या नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पुलाच्या परिसरातील नदीपात्रात तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे नदीतील पाणी एका बंधाऱ्यातून दुसऱ्या बंधाऱ्यात पडताना त्याला पांढरे शुभ्र आणि फेसाळ स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे बंधाऱ्यांमधून वाहणारे फेसाळणारे पाणी हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
नदीतील या फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर बंधाऱ्यांमधील पाण्याचा अनुभव घेणे आणि त्या अविस्मरणीय क्षणांचे मोबाईलमध्ये छायाचित्रण करणे, हा पर्यटकांचा विशेष आकर्षणाचा भाग बनला आहे. अनेक पर्यटक येथे कुटुंबीयांसह येऊन नदीकाठच्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवताना दिसून येतात.
हटवाडी परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नदीच्या आजूबाजूला असलेला शेतीचा निसर्गरम्य परिसर. सध्या नदी फार खोल नसून पाण्याचा प्रवाहही तुलनेने कमी आहे. त्यामुळे परिसरातील शांतता, हिरवाई आणि पावसाळ्यात खुलून आलेले निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून काही काळ दूर जाऊन शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हा परिसर पर्यटकांसाठी चांगला पर्याय ठरत आहे.
हटवाडी हा काहीसा दुर्गम भाग असला तरी धामणसे हे शांत, संयमी आणि सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते. या नदी परिसराच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी आमदार भैया सामंत यांनी विशेष महत्त्वाच्या सूचना केल्या असून, पुढील वर्षी येथील संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करून तो पर्यटकांसाठी अधिक आकर्षक पद्धतीने खुला करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात हटवाडीच्या पर्यटनस्थळाचा आणखी विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या आकर्षक ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ची माहिती सोशल मीडिया, रिल्स आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. रिल्स स्टार तसेच सोशल मीडियावर पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या विविध व्यक्तींनी या ठिकाणचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे हटवाडीचा हा निसर्गरम्य परिसर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या नजरेत आला आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक आणि पर्यटक आता धामणसे हटवाडीच्या दिशेने वळू लागले आहेत.
पर्यटकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक महिलांच्या बचत गटांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. पर्यटकांसाठी विविध खाद्यपदार्थ तसेच खास कोकणी खाद्यपदार्थांचे स्टॉल बचत गटांच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांची चव घेता येत असल्याने बचत गटातील महिलांच्या उत्पन्नातही भर पडत आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
एकूणच धामणसे हटवाडी पुलाजवळ उभारण्यात आलेल्या तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांमुळे या परिसरातील पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळू लागली आहे. फेसाळणारे पाणी, नदीवरील बंधारे, हिरवाईने नटलेला परिसर आणि पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य यामुळे हटवाडी आता पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण ठरत आहे. या अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांचे नयनरम्य दृश्य सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरवर पोहोचत असल्याने धामणसे गावाची पर्यटनाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
धामणसे गावातील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून नदीतील गाळ योग्य पद्धतीने काढण्यात आल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या पर्यटनस्थळाच्या विकासामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नदी परिसरात वाढणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने धामणसे ग्रामपंचायतीकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आणि पोहण्याचा आनंद घेताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी. नदी परिसरात मद्यपान करू नये, प्लास्टिकचा कचरा करू नये तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांनी केले आहे. पर्यटकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन धामणसे ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नदी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीच्या दृष्टीने विशेष सूचनाफलक लावण्यात आले आहेत. तसेच हटवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची तपासणी करून पर्यटकांची विशेष नोंदणी केली जात आहे. त्यानंतरच पर्यटकांना नदी परिसराकडे जाण्यास परवानगी दिली जात आहे.
विशेषतः शनिवार आणि रविवारच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने ग्रामपंचायतीकडून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा बंदोबस्त मागवला जात आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पुरुष तसेच महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त बजावत असून पर्यटकांना आवश्यक त्या सूचना देण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी शिस्त आणि सुरक्षितता राखण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.
एकूणच धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांच्या नियोजनातून हटवाडी ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ अधिक आकर्षक आणि विकसित करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक ग्रामपंचायत, बचत गट, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळू लागली आहे. निसर्गसौंदर्य, नदीतील अर्धवर्तुळाकार बंधारे, फेसाळणारे पाणी आणि सोशल मीडियामुळे मिळणारी प्रसिद्धी यामुळे धामणसे हटवाडीचा हा ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ आगामी काळात कोकणातील आणखी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता आहे.

