(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून तेथे भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविणाऱ्या रत्नागिरीतील गिर्यारोहक अखिल स्मिता रवींद्र काटकर यांचा जिल्ह्यातील विविध गिर्यारोहण संघटनांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या अखिल यांच्या साहसी कामगिरीचा गौरव करण्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातील विविध संस्था एकवटल्या.
अखिल काटकर यांनी २१ मे २०२६ रोजी गिरिप्रेमी संस्थेच्या अन्य दोन सहकाऱ्यांसमवेत माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील गिर्यारोहण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामगिरीची दखल घेत जिल्ह्यातील विविध गिर्यारोहण संघटनांनी एकत्र येत अखिल काटकर यांचा गौरव केला. सन्मान सोहळ्यास रत्नागिरीतील गिर्यारोहण क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, गिर्यारोहक, साहसप्रेमी तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अखिल काटकर यांच्या एव्हरेस्ट मोहिमेचे कौतुक करत त्यांच्या पुढील साहसी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
गिर्यारोहक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अखिल काटकर यांचे कार्य केवळ शिखर सर करण्यापुरते मर्यादित नाही. लहान मुलांमध्ये साहसाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना गिर्यारोहणाची शिस्त व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी ते विविध प्रशिक्षण उपक्रमांत योगदान देत आहेत. गिर्यारोहणासोबतच मॅरेथॉन, ट्रायथेलॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. एव्हरेस्ट सर करणे ही केवळ शारीरिक क्षमतेची नव्हे, तर मानसिक ताकद, चिकाटी, शिस्त आणि ध्येयावर अढळ विश्वासाची कसोटी मानली जाते. अत्यंत प्रतिकूल हवामान, आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती आणि अत्यल्प ऑक्सिजनच्या वातावरणातही अखिल काटकर यांनी दाखविलेली जिद्द आणि धैर्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरीतील अनेक नवोदित गिर्यारोहकांना नवे बळ आणि प्रेरणा मिळाली आहे.
एका शिखराची चढाई संपली; मात्र प्रेरणेचा प्रवास सुरू झाला, असेच या सन्मान सोहळ्याचे स्वरूप होते. रत्नागिरीतील विविध गिर्यारोहण संघटनांनी एकत्र येऊन केलेला अखिल काटकर यांचा गौरव हा त्यांच्या वैयक्तिक साहसी कामगिरीचा सन्मान तर आहेच; त्याचबरोबर जिल्ह्यातील गिर्यारोहण चळवळीला बळ देणारा आणि नव्या पिढीला साहस, शिस्त, तंदुरुस्ती व ध्येयपूर्तीची प्रेरणा देणारा उपक्रम ठरला आहे.

