(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरेखिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने तसेच संरक्षक भिंत कोसळल्याने अवजड वाहतूक आणि एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी, व्यापारी, मालवाहतूकदार आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा तसेच व्यापारी आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसह आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहनांची वर्दळ वाढणार असल्याने घाटातील वाहतूक सुरू होणे आवश्यक असल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
रस्त्याची सद्यस्थिती पाहता रात्रीच्या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवून दिवसा सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ठरावीक प्रकारच्या चार व सहा चाकी वाहनांना वाहतूक सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत आमदार सामंत यांनी दिले. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी आंबा घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, आंबा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रस्त्याची सुरक्षितता, वाहतुकीची क्षमता आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
या पाहणी दौऱ्यात आमदार किरण सामंत यांच्यासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरटीओ अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

