(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील झाडगाव परिसरात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेत मुलाने स्वतःच्या वडिलांवर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावची जमीन विकून गाडी घेऊन द्यावी, या मागणीवरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजेश शंकर पांचाळ (वय ५०) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांनी मुलगा ओंकार राजेश पांचाळ याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी रात्री कामावरून घरी परतल्यानंतर राजेश पांचाळ घरी होते. रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास मुलगा ओंकार याने शिरगाव येथील कुटुंबाच्या जागेवरून वादाला सुरुवात केली. गावची जमीन विकून स्वतःसाठी गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी त्याने वडिलांकडे केली. मात्र, जमीन विकण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर वातावरण अधिकच तापले.
वादाच्या भरात संतापलेल्या ओंकारने लाकडी दांडक्याने वडिलांवर प्रहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत राजेश पांचाळ जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी ओंकारविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

