(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी बावनदी येथील धोकादायक उताराने पुन्हा एकदा भीषण अपघाताचे रूप धारण केले. भरधाव वेगातील ट्रेलरने आधी दुचाकीला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १५) रात्री ११.१५ च्या सुमारास घडली.
या अपघातात प्रणय रविंद्र काडगे (वय…, रा. शिरवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर चालक मोहम्मद कासिम इलियाज खान (४८, रा. बिहार) हा गोव्यातून मुंबईच्या दिशेने ट्रेलर (क्र. MH 01 EM 2951) घेऊन भरधाव वेगाने जात होता. निवळी बावनदी येथील उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने समोर चाललेल्या दुचाकीला (क्र. MH 42 BT 4710) पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रेलर पुढे घसरत जाऊन बावनदीच्या बाजूकडून येणाऱ्या टेम्पोला (क्र. MH 07 AJ 4324) समोरून धडकला. या धडकेत टेम्पो चालक प्रणय काडगे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
या प्रकरणी निवळी येथील संजना संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयगड पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, या अपघाताची अधिकृत नोंद शुक्रवारी (दि. १६) पहाटे ४.१४ वाजता करण्यात आली.
दरम्यान, निवळी बावनदी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उतार अपघातप्रवण ठरत असताना भरधाव वाहनांवर कडक नियंत्रण, वेगमर्यादा सक्तीने अंमलात आणणे तसेच आवश्यक ती वाहतूक सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

