(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार अखेर निश्चित झाला असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांच्याकडे प्रभारी जबाबदारी सोपविली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. नाईक या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतून पदोन्नतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले होते.
अखेर उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांची प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिरभाते या स्वतः काही महिन्यांतच सेवानिवृत्त होणार असून, त्यामुळे ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची मानली जात आहे. दरम्यान, प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताच शिरभाते यांचे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शिक्षक संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवी कार्यशैलीमुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजाला स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

