(लातूर / वृत्तसंस्था)
पैशांचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. या विधीसाठी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगीरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ १६ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समोर आले. आरोपींनी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित विधी करण्याचे ठरविले होते. या विधीसाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ५७७/२०२६ नुसार महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ मधील कलम ३ (३) तसेच पोक्सो कायद्यातील कलम १२ सह कलम १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रतिबंधित आणि अमानुष विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून, अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर बाबी लक्षात घेता पोक्सो कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप गाडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमागे नेमका कोणाचा सहभाग होता, कथित विधीचा उद्देश काय होता आणि अल्पवयीन मुलीला या प्रकारात कशा पद्धतीने सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींमध्ये कुंडलिक देवराव रूपनर (४६, तितरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), सचिन साहेबराव भोंगळे (३५, धानोरा वैद्य, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला), अनिकेत सुभाष राठोड (२७, वडी, ता. जिंतूर, जि. परभणी), समीर टिनघरे (रा. पुणे), लक्ष्मण विठ्ठल करंजी (३३), सनेश सुकुमार पनिके, परमनिरास (४५), दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला (२०) आणि श्रीनिवास विरख्या चिलमुला (४५) यांचा समावेश आहे. हे तिघेही आरसीपुरम, जि. संगारेड्डी, तेलंगणा येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच बालाजी रघुनाथराव बिरादार (२५, मुबारकपूर, ता. नारायणखेड, जि. संगारेड्डी, तेलंगणा), अनंतराव गंगाराम खुनिकार (४८, निय्यापूर, ता. शेरलिंगमपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा), चंद्रया सुंदरराव कारम (४१, भिमावरम, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश), राजेश मोगली ईपन्नापल्ली (४२, दिलसुखनगर, हैदराबाद), सुनील कल्याण डेंगले (५२, हडपसर, पुणे), राजू सेवू पवार (४८, विजापूर, कर्नाटक) आणि बालाजी या आरोपींचाही गुन्ह्यात समावेश आहे.
पैशांचा पाऊस पाडणे, गुप्त धन मिळवणे किंवा अघोरी विधींमधून आर्थिक लाभ मिळवणे अशा अंधश्रद्धांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अशा प्रकारच्या प्रथा आणि त्यातून होणाऱ्या शोषणाला आळा घालण्यासाठी राज्यात कायदा लागू आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या कथित अमानुष विधींविरोधात पुन्हा एकदा कठोर कारवाईचा संदेश गेला आहे.

