( पुणे )
पुणे जिल्ह्यातील बेलसर येथे असलेल्या वाडा ॲग्रो मशरूम कंपनीमध्ये भीषण दुर्घटना घडली. ड्रेनेज टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकं काय घडलं?
मशरूम उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची टाकी साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी एक कामगार टाकीत उतरला; मात्र तो बराच वेळ बाहेर न आल्याने दुसरा कामगार त्याला पाहण्यासाठी खाली गेला. दोघेही परत न आल्याने तिसऱ्यानेही टाकीत शिरण्याचा निर्णय घेतला. टाकीत साठलेल्या विषारी वायूमुळे तिघेही काही क्षणांत बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज टाकीवरील सिमेंटचा स्लॅब फोडून तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, ड्रेनेज टाकीत साचलेल्या कचऱ्यामुळे आणि उष्णतेमुळे विषारी वायू तयार झाला होता. या वायूमुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मृतांची ओळख
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे पुढीलप्रमाणे:
- पिंटू राजेश प्रसाद (वय 23)
- व्यास सोहम कुमार (वय 22)
- गौतम रामसूरन कुशवाहा (वय 36)
(सर्व रा. देवरिया जिल्हा)
या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत. घटनेबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा कामांसाठी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर आणि योग्य प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

