(रत्नागिरी / प्रतिनिधी)
समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतीगृहाचे गृहपाल दीपक जाधव यांनी आपली कार्यतत्परता, शिस्तबद्ध कार्यपद्धती व विद्यार्थ्यांसाठी केलेले उपक्रम या माध्यमातून आदर्शवत कार्य घडवून आणले आहे. त्यांच्या याच कामगिरीचा गौरव म्हणून सन २०२५-२६ या वर्षासाठी मुंबई विभागातर्फे त्यांना उत्कृष्ट गृहपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानानंतर जाधव यांचा सहकुटुंब विशेष सत्कार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहात पार पडला. या वेळी उपस्थितांनी कृतिशील कार्याने समाजकल्याण विभागाचा दर्जा उंचावणाऱ्या जाधव यांना उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात रवींद्र कुमठेकर, श्री. खेडेकर, रितेश सोनवणे, अमोल पाटील यांच्यासह समाजकल्याण विभागातील कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गृहपाल म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे काम जाधव यांनी सातत्याने केले. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना विभागीय स्तरावरील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मिळाल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.

