(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा रानपाट येथील विद्यार्थी विराज हेमंत कुवार याने एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. विराजने रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचे, गावाचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
विराजने जिल्हा गुणवत्ता यादीत १०० वे स्थान, तर रत्नागिरी तालुक्यात १९ वे स्थान पटकावले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळविलेल्या या यशामुळे रानपाट शाळेत आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.
विराजला परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक शिक्षक सुहास भितळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी शिक्षक अजय माने यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विराजच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते आणि केंद्र समन्वयक रोहित पाटोळे यांनीही विराजसह त्याचे मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेतील शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची कमतरता नसून, योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि संधी मिळाल्यास तेही उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे विराजने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
विराजच्या या यशाबद्दल रानपाट शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक तसेच केंद्र व परिसरातील शिक्षकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

