(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राई शिर्के खापरेवाडी येथील दोन विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अर्णव भरत दसम आणि तीर्था दीपक खापरे यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.
अर्णव दसम याने जिल्हा गुणवत्ता यादीत ३० वा, तर तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला. तीर्था खापरे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ३३ वे, तर तालुक्यात पाचवे स्थान मिळविले.
या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब हाडंबर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक तुकाराम मुरकुटे यांचे सहकार्य मिळाले.
खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते तसेच बोंडे केंद्राचे केंद्र समन्वयक रोहित पाटोळे यांनी अर्णव आणि तीर्था यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल तसेच गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अर्णव आणि तीर्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

