(जाकादेवी / संतोष पवार)
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध साहित्याच्या माध्यमातून साकारलेल्या देशभक्तीपर भित्तिपत्रकाचे अनावरण जाकादेवी विद्यालयाचे सीईओ के. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या भित्तिपत्रकातून थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, देशभक्त, कर्तबगार महिला तसेच देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि देशभक्तांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
या भित्तिपत्रकाचे संपादन सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष पवार व वैभव खानोलकर यांनी केले, तर आकर्षक सजावट कलाशिक्षक प्रणित जाधव यांनी केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
भित्तिपत्रकाच्या अनावरणप्रसंगी संस्थेचे संचालक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. तसेच संपादक मंडळ, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक श्याम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, संतोष पवार, वैभव खानोलकर तसेच स्काऊट-गाईड विभागाचे विशेष आभार मानले.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संगीतमय गीतांच्या तालावर कवायत सादर केली. विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक श्याम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, केशव राठोड, मंदार रसाळ, अमित बोले, हेमराज बहिरम, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, नामदेव वाघमारे, राजाराम पात्ये, माता-पालक संघाच्या अध्यक्षा माधवी गोताड तसेच पालक संघाचे महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका मनिषा धोंगडे आणि क्रीडाशिक्षक संतोष सनगरे व किशोर नलवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

